खात रहा… वजन कमी करत रहा!
खात रहा… वजन कमी करत रहा! ...
“काल एका जुन्या मित्राकडून वजन कमी करण्याच्या प्रोग्रामचं आमंत्रण पाहिलं. पण झटपट वजन कमी करण्याच्या ,औषध इतर गोष्टीं का योग्य आहार आणि व्यायाम खरा उपाय काय आहे?हा प्रश्न मनात पडला.
आजचा माणूस हा इतिहासातला कदाचित सर्वांत विरोधाभासी जीव आहे. एकीकडे तो अन्नाच्या विपुलतेत जगतो, तर दुसरीकडे आजारांच्या ओझ्याखाली दबलेला आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांत लठ्ठपणाचं प्रमाण वेगवेगळं असलं, तरी त्याची दिशा मात्र एकसारखी आहे—वरच्या दिशेने. कुठे हे प्रमाण जास्त आहे, कुठे कमी; कुठे त्यातून होणारे मृत्यू अधिक आहेत, कुठे थोडे कमी. पण लठ्ठपणा हा आता अपवाद राहिलेला नाही, तो नियम बनत चालला आहे.
लठ्ठपणा म्हणजे फक्त जास्त खाणं किंवा कमी चालणं, एवढी सोपी गोष्ट नाही. तो एक संपूर्ण व्यवस्थेचा परिणाम आहे. अन्नउद्योग, जाहिरातउद्योग, मनोरंजनविश्व आणि औषधउद्योग—या चौघांनी मिळून एक अशी यंत्रणा उभी केली आहे, जिथे माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक म्हणूनच जगतो. आधी त्याला खायला लावलं जातं, मग त्याच खाण्याचे परिणाम कमी करण्यासाठी उपाय विकले जातात. हा व्यवहार इतका गुळगुळीत आहे की त्यात कुणालाच अपराधी वाटत नाही.
माणसाचं शरीर हालचालीसाठी बनलेलं आहे. चालणं, धावणं, उचलणं, वाकणं, जिने चढणं—या सगळ्या गोष्टी त्याच्या जगण्याचा भाग होत्या. स्वयंपाक, कपडे धुणं, घर साफ करणं, शेतात किंवा कारखान्यात काम करणं—या सगळ्या क्रिया नकळत व्यायाम घडवत होत्या. पण आधुनिक जीवनशैलीनं हळूहळू हे सगळं काढून टाकलं. काम बसूनच करायचं, प्रवास बसूनच करायचा, करमणूकही बसूनच घ्यायची. शरीर स्थिर झालं, पण तोंड चालूच राहिलं.
आज अन्न सहज उपलब्ध आहे. भूक लागली नाही तरी खायला मिळतं. वेळ नाही तरी खायला मिळतं. घरी जायची गरज नाही, बाहेर जायची गरज नाही—एक क्लिक, एक कॉल, आणि अन्न दारात. त्यावर मीठ, साखर, तेल यांचं प्रमाण असं वाढवलेलं की चव लगेच जिभेवर बसते. शरीर ‘पुरे’ म्हणायच्या आतच मेंदू ‘आणखी’ म्हणायला लागतो. पोट भरल्याची नैसर्गिक जाणीव बोथट होते.
या सगळ्यात भर पडते ती तणावाची. पैसा हा आजच्या जगण्याचा केंद्रबिंदू आहे. कमी मिळाला तरी तणाव, जास्त मिळाला तरी तणाव. मिळवण्याचा, टिकवण्याचा, वाढवण्याचा ताण. या तणावातून माणूस सुख शोधतो, आणि ते सुख बहुतेक वेळा खाण्यात सापडतं. चटकदार पदार्थ तात्पुरता दिलासा देतात. पण हा दिलासा वजन वाढवत जातो, आणि वजनाबरोबरच आजारांची यादीही लांबत जाते.
मनोरंजनविश्व या प्रक्रियेला आणखी धार देतं. क्रिकेट, रिअॅलिटी शो, मालिका—या सगळ्यांत खेळ किंवा कला दुय्यम आणि जाहिरात प्रमुख बनते. मैदानावर मोजके खेळाडू घाम गाळतात, तर कोट्यवधी प्रेक्षक टीव्हीसमोर बसून पाहतात. त्याच वेळी चिप्स, पिझ्झा, गोड पेय हातात असतं. खेळाडूंच्या शर्टांवर, मैदानाच्या भिंतींवर, स्क्रीनवर—सगळीकडे जाहिराती. त्या जाहिराती नकळत सांगत राहतात की काय खायचं, काय प्यायचं, कसं जगायचं.
सण-उत्सवांचंही तेच झालं आहे. पूर्वी सण म्हणजे श्रम, तयारी, घराघरांत चालणारी हालचाल. आज सण म्हणजे ऑफर, सूट, घरपोच सेवा. चकल्या, लाडू, पुरणपोळ्या, केक—सगळं तयार. बनवण्याचा आनंद नाही, श्रम नाहीत; फक्त खाणं. आणि हे सगळं वर्षभर सुरू असतं. एक सण संपतो, दुसऱ्याची जाहिरात सुरू होते.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे वाढत चाललेला लठ्ठपणा आणि त्यातून उद्भवणारे आजार—उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग. डॉक्टर सांगतात, अभ्यासक इशारा देतात; पण व्यवस्थेचा वेग त्याहून जास्त आहे. आणि मग मैदानात उतरतो तो औषधउद्योग. वजन कमी करणारी औषधं, भूक कमी करणारी इंजेक्शन्स, चयापचय बदलणारी रसायनं. आधी वजन दहा टक्क्यांनी कमी होतं, मग वीस टक्क्यांनी. रोजची गोळी, आठवड्याची मात्रा, महिन्याचं इंजेक्शन—सगळं सोयीचं.
या औषधांभोवतीही आश्वासनांचा पाऊस असतो. वजन कमी होईलच, पण हृदयाचं आरोग्य सुधारेल, मधुमेह आटोक्यात येईल, आयुष्य वाढेल. उद्या कदाचित कॅन्सरवरही त्याच गोळीचा उपयोग होईल, असंही सांगितलं जाईल. प्रत्येक नवं औषध मागच्या औषधापेक्षा महाग, आणि तरीही मागणी वाढतीच. कारण माणसाला श्रम नकोत, शिस्त नको, बदल नको—फक्त उपाय हवा.
औषध कंपन्यांची अब्जावधींची कमाई, त्यांची वाढती बाजारमूल्यं पाहिली की हे स्पष्ट होतं की लठ्ठपणा हा आजार नसून एक संधी आहे. जितके जास्त लोक वजनदार, तितका जास्त नफा. अन्नउद्योग आणि औषधउद्योग हे एकमेकांचे विरोधक नाहीत, तर पूरक आहेत. एकाने समस्या निर्माण करायची, दुसऱ्याने उपाय विकायचा. या चक्रात माणूस अडकलेला आहे.
या सगळ्यात हरवतो तो साधा प्रश्न—आपल्याला खरंच किती खाणं आवश्यक आहे? शरीराला खरंच काय हवं आहे? चालणं, श्रम करणं, साधेपणा हे शब्द जुनाट वाटायला लागले आहेत. पण शरीराच्या दृष्टीने तेच खरे आधुनिक उपाय आहेत. मात्र ते उपाय बाजारात विकता येत नाहीत, म्हणून त्यांची जाहिरातही नसते.
म्हणूनच आजचा संदेश सरळ आहे, पण उपरोधिक आहे—मनुष्यहो, खात रहा. वजन वाढू द्या. आणि मग ते कमी करण्यासाठी औषधं घेत रहा. कारण ही व्यवस्था तुमच्या आरोग्यासाठी नाही, तर तिच्या नफ्यासाठी उभी आहे. आणि जोपर्यंत आपण हे ओळखत नाही, तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही.©
Comments
Post a Comment