सोशल मीडिया सांत्वन : औपचारिकतेचा सोपा मार्ग की भावनांचा अपमान?

 सोशल मीडिया सांत्वन : औपचारिकतेचा सोपा मार्ग की भावनांचा अपमान?

स्मार्टफोनच्या सुळसुळाटानंतर आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी झपाट्याने बदलल्या. संवादाची पद्धत बदलली, नात्यांचा आविष्कार बदलला, भावना व्यक्त करण्याचे मार्ग बदलले. पूर्वी पत्रातून, प्रत्यक्ष भेटीतून, डोळ्यात डोळे घालून बोलण्यातून व्यक्त होणाऱ्या भावना आता दोन-चार शब्दांच्या मेसेजमध्ये सामावल्या जातात. वाढदिवस असो, लग्नाची वर्षगाठ असो, अभिनंदन असो किंवा दुःखद प्रसंग — सर्व काही एका क्लिकवर आटोपते. या बदलत्या प्रवाहात “सोशल मीडिया सांत्वन” हा एक नवा ट्रेंड म्हणून रुळला आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःखद घटना घडली की लगेच ग्रुपवर किंवा वैयक्तिक चॅटवर “ओम शांती”, “भावपूर्ण श्रद्धांजली”, “Rest in Peace” असे ठराविक शब्द टाईप करून पाठवले की आपले कर्तव्य संपले, अशी एक समजूत तयार झाली आहे. या प्रवाहाकडे पाहताना प्रश्न पडतो — हे खरे सांत्वन आहे की केवळ औपचारिकतेचा सोपा मार्ग?

सांत्वन ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नसते; ती भावनांची देवाणघेवाण असते. दुःखात असलेल्या व्यक्तीच्या पाठीवर हलकेच ठेवलेला हात, शांतपणे शेजारी बसून राहणे, “आम्ही आहोत” असे न बोलताही जाणवणारे अस्तित्व — हे खरे सांत्वन असते. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या व्यक्तीला आपले शब्द दुःख कमी करून देत नाहीत, पण आधार देतात, एकटेपण कमी करतात. अशा वेळी मोबाईलच्या पडद्यावर झळकणारे दोन शब्द कितपत आधार देऊ शकतात? विशेषतः जेव्हा ते शब्द कॉपी-पेस्ट करून पाठवलेले असतात, कोणतीही वैयक्तिक भावना किंवा संदर्भ नसलेले असतात?

आजकाल अनेक जण दुःखद बातमी ऐकताच सर्वप्रथम सोशल मीडिया उघडतात. कोणीतरी ग्रुपवर माहिती दिलेली असते आणि त्याखाली लगेच सांत्वनपर मेसेजची रांग लागते. एकाने “ओम शांती” लिहिले की पुढचा त्याच शब्दांची पुनरावृत्ती करतो. काही वेळा तर वरचा मेसेज नीट न वाचताही लोक प्रतिक्रिया देतात. एका प्रसंगी एका ग्रुपवर गैरसमजातून जिवंत व्यक्तीबद्दल श्रद्धांजलीचे संदेश पाठवले गेले. कारण वरच्या व्यक्तीने काहीतरी गंभीर लिहिले होते आणि पुढच्यांनी विचार न करता “Rest in Peace” लिहीत गेले. या प्रकारात केवळ हास्यास्पदता नाही; यात संवेदनशीलतेचा अभावही दिसतो. दुःखाच्या प्रसंगातही आपण इतके घाईत, इतके यांत्रिक कसे होऊ शकतो?

काही जणांचा युक्तिवाद असतो की सर्वांनाच प्रत्यक्ष भेटणे शक्य नसते. भौगोलिक अंतर, कामाच्या जबाबदाऱ्या, वेळेची मर्यादा — या सगळ्या गोष्टी वास्तव आहेत. दूर राहणाऱ्या व्यक्तींसाठी मेसेज हा एक सोपा मार्ग आहे, हे मान्यच. पण प्रश्न हा आहे की जवळच्या नात्यांमध्येही आपण हा सोपा मार्ग का निवडतो? एखादा निकटवर्तीय व्यक्ती दुःखात असताना त्याला फोन करणे, त्याचा आवाज ऐकणे, काही शब्द बोलणे — हे अधिक मानवी नाही का? जरी आपण फार काही बोलू शकलो नाही तरी “तुझ्यासोबत आहे” हे थेट सांगणे अधिक परिणामकारक ठरत नाही का?

पूर्वी सांत्वन करायला जाण्याला “हाक मारायला जाणे” असे म्हणत. या शब्दप्रयोगातच एक आत्मीयता दडलेली आहे. कुणाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण घरातून निघतो, त्याच्या दारात उभे राहतो, काही वेळ शांतपणे बसतो. हे केवळ सामाजिक कर्तव्य नव्हते; ते भावनिक नात्याचे प्रतीक होते. आज मात्र आपण घरातून निघण्याऐवजी मोबाईल हातात घेतो. दोन मिनिटांत मेसेज पाठवतो आणि पुढच्या कामाला लागतो. दुःख व्यक्त करणाऱ्याच्या मनात मात्र पडद्यावर आलेले ते शब्द कदाचित काही क्षण दिसतात आणि मग असंख्य नोटिफिकेशनमध्ये हरवून जातात.

याचा अर्थ असा नाही की प्रत्येक सोशल मीडिया मेसेज कृत्रिम असतो. काही वेळा लोक मनापासून लिहितात, आपल्या आठवणी शेअर करतात, आधाराचे शब्द देतात. अशा वेळी डिजिटल माध्यमही भावनिक पूल बनू शकते. परंतु बहुतांश वेळा आपण तयार साच्यातील शब्द वापरतो. जणू सांत्वनाचेही काही ठराविक टेम्प्लेट तयार झाले आहेत. “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, “भावपूर्ण श्रद्धांजली”, “Stay strong” — हे शब्द इतके वापरले गेले आहेत की त्यांची तीव्रता कमी झाली आहे. ते एक सामाजिक संकेत बनले आहेत, भावनिक अनुभव नव्हे.

सांत्वनाचा खरा अर्थ काय? दुःखात असलेल्या व्यक्तीच्या भावनांना मान्यता देणे, त्याच्या वेदनेला कमी लेखू नये, त्याला वेळ देणे, ऐकून घेणे — हे त्यात अपेक्षित असते. सोशल मीडिया मेसेजमध्ये ही सगळी परिमाणे सामावणे कठीण आहे. शिवाय दुःखाच्या पहिल्या काही दिवसांत व्यक्ती प्रचंड मानसिक धक्क्यात असते. त्या काळात केलेला फोन, दिलेली भेट अधिक परिणामकारक असते. काही दिवसांनी औपचारिक मेसेज पाठवून “दखल घेतली” असे दाखवण्यात फारसा अर्थ उरत नाही. काळ हेच मोठे औषध आहे, असे म्हणतात; पण त्या काळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिलेला मानवी आधार अधिक महत्त्वाचा असतो.

काही वेळा सोशल मीडिया सांत्वन हे कॅल्क्युलेटिव्ह वाटते. “आपण मेसेज केला नाही तर लोक काय म्हणतील?” या भीतीपोटी किंवा “ग्रुपवर सगळ्यांनी केले आहे, आपणही करावे” या मानसिकतेतून मेसेज पाठवले जातात. यात भावनांपेक्षा सामाजिक प्रतिमा जपण्याचा भाग अधिक असतो. अशा वेळी सांत्वन हा एक सामाजिक अभिनय ठरतो. दुःखी व्यक्तीला कदाचित या गोष्टींची जाणीवही होते. त्याला खरे आणि खोटे यातील फरक समजतो. ज्यांनी फोन केला, भेट दिली, शांतपणे साथ दिली — त्यांची आठवण वेगळी राहते; आणि ज्यांनी केवळ मेसेज पाठवला त्यांची वेगळी.

यात आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे माहितीची पडताळणी. सोशल मीडियावर अफवा वेगाने पसरतात. एखाद्या व्यक्तीच्या निधनाची खोटी बातमी पसरली आणि लोकांनी श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली, असे प्रसंग आपण पाहिले आहेत. अशा वेळी सांत्वनाचे मेसेज केवळ संवेदनशीलतेचा अभाव दर्शवत नाहीत, तर जबाबदारीहीन वर्तनाचे उदाहरण ठरतात. मूळ माहिती काय आहे, ती खात्रीची आहे का, हे तपासणे ही किमान अपेक्षा आहे. पण गतीच्या युगात आपण थांबून विचार करण्याची सवय गमावत चाललो आहोत.

डिजिटल माध्यमांनी संवाद सुलभ केला, यात शंका नाही. परदेशात असलेल्या नातेवाईकांपर्यंत बातमी पोहोचवणे, त्वरित संपर्क साधणे — हे सर्व या साधनांमुळे शक्य झाले. परंतु साधन आणि संवेदना यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. सोशल मीडिया हा संपर्काचा पूल असू शकतो, पण तो नात्यांचा पर्याय होऊ नये. सांत्वनाचा मेसेज हा सुरुवात असू शकतो; त्यानंतर फोन, व्हिडिओ कॉल, प्रत्यक्ष भेट — या माध्यमातून नात्याला स्पर्श हवा.

भावनाप्रधान आणि संवेदनशील व्यक्तींना केवळ शब्दांचा मेसेज अपुरा वाटतो. त्यांना संवाद हवा असतो, सहवास हवा असतो. दुःख व्यक्त करण्यासाठी वेळ हवा असतो. काही वेळा व्यक्ती काहीच बोलत नाही; फक्त रडते. त्या वेळी “Stay strong” असा मेसेज पाठवणे कितपत योग्य? कदाचित त्या व्यक्तीला मजबूत राहण्याची अपेक्षा नसून, कमकुवत होण्याची मोकळीक हवी असते. खरे सांत्वन म्हणजे तिच्या भावनांना स्वीकारणे.

आजच्या पिढीला डिजिटल संवाद अधिक सोयीचा वाटतो. ते त्यांच्या भाषेत, त्यांच्या वेगात जगतात. त्यामुळे त्यांना पूर्णपणे दोष देणेही योग्य नाही. परंतु संवेदनशील प्रसंगांमध्ये थोडी अधिक जाणीव, थोडा अधिक वेळ, थोडा अधिक विचार आवश्यक आहे. आपण ज्यांच्याशी निकटचे नाते ठेवतो, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये आपण अधिक सक्रिय असायला हवे. फक्त स्टेटस पाहून किंवा ग्रुपवरील मेसेज वाचून आपली भूमिका संपत नाही.

शेवटी प्रश्न इतकाच आहे की आपण नात्यांकडे कसे पाहतो? ती फक्त संपर्क यादीतील नावे आहेत का, की आपल्या आयुष्याचा भाग आहेत? जर ती आपल्या आयुष्याचा भाग असतील तर त्यांच्या दुःखात आपणही थोडेसे सामील व्हायला हवे. सोशल मीडिया सांत्वन हा पर्याय असू शकतो, पण तो अंतिम स्वरूप नसावा. कृत्रिम औपचारिकतेपेक्षा थोडीशी खरी उपस्थिती अधिक मौल्यवान असते. दोन शब्दांच्या मेसेजपेक्षा दोन मिनिटांचा फोन अधिक अर्थपूर्ण ठरतो. आणि कधीकधी शब्दांपेक्षा शांत सहवास अधिक बोलका असतो.

तंत्रज्ञानाच्या युगात मानवी स्पर्श जपणे हीच खरी कसोटी आहे. वेग, सोय, सुविधा या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी संवेदनशीलतेची जागा त्या घेऊ शकत नाहीत. दुःखाच्या प्रसंगी आपण थोडे थांबूया, विचार करूया, आणि शक्य असेल तिथे प्रत्यक्ष संपर्क साधूया. कारण सांत्वन हे केवळ पाठवायचे मेसेज नसते; ते जगायचे नाते असते. कृत्रिम सोशल मीडिया सांत्वनापेक्षा मनापासून दिलेला आधारच शेवटी स्मरणात राहतो.©


Comments

Popular posts from this blog

कायदेशीर अनाथपणात अडकलेले समाजकार्य : मूल्यांची परंपरा आणि व्यवस्थेची उदासीनता

औषध तुमचे, वेदना तुमच्या — पण कायदा त्यांचा!

चौथा स्तंभ की सत्तेची काठी? : टीव्ही न्यूजची पडझड