पैशांच्या हव्यासासाठी कोवळ्या जीवांची कत्तल — अवैध गर्भपाताच्या सावलीत महिलांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ

 पैशांच्या हव्यासासाठी कोवळ्या जीवांची कत्तल — अवैध गर्भपाताच्या सावलीत महिलांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ 

महाराष्ट्र  पुरोगामी,प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते. शिक्षण, उद्योग, सामाजिक चळवळी आणि स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत देशात आघाडीवर असलेले हे राज्य अनेक बाबतीत आदर्श मानले जाते. मात्र या प्रगतीच्या चमकदार आवरणामागे काही काळोख्या वास्तवांचे सावटही तितक्याच ठळकपणे दिसून येते. त्यापैकी एक गंभीर आणि मानवी संवेदनांना हादरवून टाकणारा प्रश्न म्हणजे अवैध गर्भपाताचा वाढता उद्योग. कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकत, पैशांच्या हव्यासापोटी काही प्रशिक्षित डॉक्टर, काही अपात्र वैद्यकीय व्यक्ती, तसेच झोलाछाप वैद्य यांच्या संगनमताने कोवळ्या कळ्यांची अक्षरशः कत्तल सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी समोर येत आहे. हा प्रश्न केवळ एका भ्रूणाच्या नाशापुरता मर्यादित नाही; तर तो स्त्रियांच्या आरोग्याशी, त्यांच्या सन्मानाशी आणि समाजाच्या नैतिकतेशी थेट निगडित आहे.

भारतामध्ये गर्भपातासंदर्भात स्पष्ट कायदे (MTP act ) अस्तित्वात आहेत. वैद्यकीय कारणे, आईच्या आरोग्याला धोका, बलात्काराची घटना किंवा काही विशिष्ट परिस्थितीत कायद्याने गर्भपाताला परवानगी दिलेली आहे. या प्रक्रियेला सुरक्षित आणि नियमनबद्ध बनवण्यासाठी वैद्यकीय गर्भपात कायदा लागू करण्यात आला. याशिवाय गर्भलिंग तपासणी रोखण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी कठोर कायदेही अस्तित्वात आहेत. कागदोपत्री व्यवस्था मजबूत दिसत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या कायद्यांची अंमलबजावणी अत्यंत ढिसाळ पद्धतीने होताना दिसते. याच ढिलाईचा फायदा घेत काही स्वार्थी प्रवृत्तीने अवैध गर्भपाताचा मोठा गोरखधंदा उभा केला आहे.

अवैध गर्भपाताच्या वाढीमागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि मानसिक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे समाजात अजूनही टिकून असलेली मुलगा प्राधान्याची मानसिकता. अनेक कुटुंबांमध्ये मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो, तर मुलगी ही आर्थिक ओझे असल्याची चुकीची समजूत अजूनही काही भागांत दिसून येते. परिणामी गर्भलिंगाची माहिती मिळाल्यानंतर मुलगी असल्यास गर्भपात करण्याचा दबाव महिलांवर टाकला जातो. कायद्याने गर्भलिंग तपासणीवर बंदी असली तरी काही ठिकाणी बेकायदेशीरपणे ही तपासणी केली जाते आणि त्यानंतर गर्भपाताचा मार्ग अवलंबला जातो.

दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सामाजिक भीती आणि प्रतिष्ठेचा प्रश्न. अविवाहित महिलांच्या बाबतीत गर्भधारणा झाल्यास समाजातील टीका, अपमान आणि कुटुंबाची बदनामी होईल या भीतीमुळे काही वेळा महिलांना गुप्तपणे गर्भपात करावा लागतो. अशा वेळी सुरक्षित आणि कायदेशीर मार्गाऐवजी बेकायदेशीर क्लिनिककडे वळण्याची वेळ येते. या परिस्थितीचा फायदा घेत काही लोक पैशासाठी अशा महिलांना अवैध गर्भपाताच्या जाळ्यात अडकवतात.

गरीबी आणि आर्थिक अडचणी हेही अवैध गर्भपाताचे मोठे कारण आहे. अनेक कुटुंबांना आधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्यास त्याचा आर्थिक भार वाढेल या भीतीने काही लोक गर्भपाताचा निर्णय घेतात. विशेषतः ग्रामीण भागात आणि वस्त्या  मध्ये आर्थिक असुरक्षिततेमुळे अशा घटना अधिक आढळतात. काही वेळा कुटुंबातील पुरुष सदस्य किंवा सासरच्या मंडळींकडून महिलांवर गर्भपाताचा दबाव टाकला जातो.

शिक्षणाचा अभाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी, गर्भनिरोधक साधनांविषयी किंवा कायदेशीर प्रक्रियेविषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अनपेक्षित गर्भधारणा झाल्यास त्या घाबरून जातात आणि सहज उपलब्ध असलेल्या बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करतात. योग्य समुपदेशन आणि माहितीच्या अभावामुळे अवैध गर्भपाताच्या घटना वाढतात.

आरोग्य सेवांचा अभाव हे देखील एक वास्तव आहे. ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवा मिळणे कठीण जाते. अशा परिस्थितीत जवळपास उपलब्ध असलेल्या अपात्र व्यक्तीकडे जाऊन गर्भपात करून घेण्याची वेळ येते. हे लोक कोणत्याही वैद्यकीय प्रशिक्षणाशिवाय किंवा अपुरी साधने वापरून ही प्रक्रिया करतात, ज्यामुळे महिलांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो.

याशिवाय काही ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींचा पैशाचा हव्यास हा देखील अवैध गर्भपाताच्या वाढीला कारणीभूत ठरतो. कायद्याने परवानगी नसतानाही मोठ्या रकमेच्या बदल्यात गर्भपात करण्याचे प्रकार उघडकीस येतात. काही वेळा डॉक्टर, दवाखाने आणि दलाल यांचे एक जाळे तयार झालेले असते. हे लोक गुप्तपणे रुग्ण शोधतात आणि त्यांना अवैध सेवा पुरवतात.

या प्रकारामागे प्रशासनाच्या निष्क्रियतेचाही काही अंशी वाटा आहे. जर नियमित तपासणी, छापे आणि कठोर कारवाई झाली, तर अशा बेकायदेशीर क्लिनिकना आळा बसू शकतो. मात्र काही वेळा या बाबतीत पुरेशी दक्षता घेतली जात नाही. परिणामी अवैध गर्भपाताचे प्रकार गुप्तपणे सुरू राहतात.

या सर्व कारणांमुळे अवैध गर्भपाताचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. हा प्रश्न केवळ एका भ्रूणाच्या मृत्यूपुरता मर्यादित नाही; तर तो स्त्रियांच्या आरोग्याशी, त्यांच्या अधिकारांशी आणि समाजाच्या नैतिकतेशी जोडलेला आहे. महिलांना सुरक्षित आरोग्यसेवा मिळावी, त्यांच्यावर कोणताही सामाजिक किंवा कौटुंबिक दबाव येऊ नये आणि अजन्म्या जीवांचे संरक्षण व्हावे यासाठी समाज आणि शासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्राला सामाजिक सुधारकांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्यांनी स्त्री शिक्षण, समानता आणि मानवी हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या समाजाने आज अशा अमानुष प्रवृत्तींचा ठामपणे विरोध करण्याची गरज आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण करणे आणि अजन्म्या जीवांचे अस्तित्व जपणे ही केवळ कायद्याची जबाबदारी नाही; ती आपल्या सामूहिक नैतिकतेचीही कसोटी आहे.

अवैध गर्भपाताच्या या अंधाऱ्या वास्तवावर पडदा टाकण्याऐवजी त्याला धैर्याने सामोरे जाणे आणि ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. समाजाची मानसिकता बदलणे, महिलांना शिक्षण आणि आरोग्यविषयक माहिती देणे, प्रशासनाने कठोर कारवाई करणे आणि वैद्यकीय क्षेत्राने नैतिकतेचे भान राखणे — या सर्व गोष्टींच्या एकत्रित प्रयत्नांतूनच या समस्येवर कायमस्वरूपी उपाय सापडू शकतो. जर आपण आजही दुर्लक्ष केले, तर पैशाच्या हव्यासासाठी कोवळ्या जीवांची कत्तल करणारे हे कत्तलखाने पुढेही सुरूच राहतील आणि त्याची किंमत समाजाला मोजावी लागेल.©

Comments

Popular posts from this blog

कायदेशीर अनाथपणात अडकलेले समाजकार्य : मूल्यांची परंपरा आणि व्यवस्थेची उदासीनता

औषध तुमचे, वेदना तुमच्या — पण कायदा त्यांचा!

चौथा स्तंभ की सत्तेची काठी? : टीव्ही न्यूजची पडझड