सोशल मीडिया वर चे पोपट!
सोशल मीडिया वर चे पोपट!
सोशल मीडियाने माणसाला अभिव्यक्तीचं एक असं व्यासपीठ दिलं, जिथे प्रत्येकजण स्वतःचं मत मांडू शकतो, स्वतःचा आवाज निर्माण करू शकतो आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पूर्वी वृत्तपत्रांच्या संपादकीय पानांवर किंवा सभागृहांमध्ये मर्यादित असलेली मतप्रदर्शनाची जागा आज फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि एक्ससारख्या माध्यमांवर सामान्य माणसाच्या हातात आली आहे. ही गोष्ट लोकशाहीसाठी सकारात्मक असली, तरी त्याचसोबत सोशल मीडियाने काही विचित्र मानसिकतांनाही जन्म दिला आहे. त्यातलीच एक महत्त्वाची मानसिकता म्हणजे “सोशल मीडिया वर चे पोपट.” हे पोपट म्हणजे असे लोक, ज्यांना स्वतःचं फारसं काही म्हणणं नसतं; पण दुसऱ्यांनी काय म्हटलं, कोण कुणाबद्दल काय लिहिलं, कुणी कोणावर टीका केली, कुणी कोणाची खिल्ली उडवली, याची सतत पुनरावृत्ती करत राहण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळत असतो.
पोपट हा पक्षी बोलका असतो. तो स्वतः विचार करत नाही, पण जे ऐकतो तेच परत बोलत राहतो. सोशल मीडियावरची ही पोपट मंडळीही अगदी तशीच असतात. कुणाच्या तरी पोस्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा, तो दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवायचा, मग तिथल्या प्रतिक्रियांचा स्क्रीनशॉट पुन्हा तिसऱ्या ग्रुपमध्ये पोहोचवायचा, आणि अशा प्रकारे एक अखंड साखळी तयार करायची, हा त्यांचा मुख्य उद्योग असतो. या उद्योगातून त्यांना काय मिळतं, हे कदाचित त्यांनाही ठाऊक नसतं; पण सोशल मीडियावरच्या अनेक भांडणांचा जीव की प्राण हीच मंडळी असतात, हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
आपण सोशल मीडिया वर एखाद्या सामाजिक किंवा राजकीय विषयावर पोस्ट लिहितो. उदाहरणार्थ, एखाद्या सरकारी निर्णयावर टीका करतो, एखाद्या सामाजिक प्रश्नावर भूमिका मांडतो किंवा एखाद्या नेत्याच्या विधानावर प्रश्न उपस्थित करतो. काही लोकांना ते पटतं, काहींना पटत नाही. मतभेद ही लोकशाहीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेक लोक सभ्य भाषेत प्रतिवाद करतात. “तुमचं मत चुकीचं वाटतं कारण…” असं म्हणत मुद्देसूद चर्चा करतात. अशा लोकांमुळे संवाद टिकून राहतो. पण काही लोकांना विचारांशी संवाद साधणं जमत नाही. मग ते थेट व्यक्तीवर उतरतात. “तू कोण?”, “तुला पैसे मिळतात का?”, “तुझा अजेंडा काय आहे?”, “तुझं चारित्र्य काय आहे?” अशा पातळीवर चर्चा घसरते.
अशा लोकांना ब्लॉक करणं हा सोशल मीडियावरचा एक आवश्यक स्वसंरक्षणाचा उपाय असतो. कारण प्रत्येक गलिच्छ प्रतिक्रियेला उत्तर देत बसणं म्हणजे स्वतःचं मानसिक स्वास्थ्य खराब करून घेणं. पण गंमत अशी की आपण एखाद्याला ब्लॉक केलं, तरी त्याच्यापर्यंत आपली पोस्ट पोहोचतच राहते. आपण लिहिलेल्या पोस्टवर तो दुसरीकडे चर्चा करत असतो. आपल्या पोस्टचे स्क्रीनशॉट विविध ग्रुपमध्ये फिरत असतात. मग प्रश्न पडतो — हे सगळं होतं कसं? इथेच फेसबुकवरच्या पोपटांचा खरा खेळ सुरू होतो.
ही पोपट मंडळी प्रत्येक ग्रुपमध्ये असतात. एका राजकीय विचारसरणीच्या ग्रुपमध्येही असतात आणि विरोधी विचारसरणीच्या ग्रुपमध्येही असतात. एका मित्रगटातही असतात आणि दुसऱ्या गटातही. त्यांचं मुख्य काम म्हणजे माहिती वाहून नेणं. पण ही माहिती साधी नसते; ती स्क्रीनशॉटच्या रूपात असते. कारण स्क्रीनशॉटला सोशल मीडियावर एक प्रकारचा “पुरावा” मानलं जातं. एखाद्याने काय लिहिलं, याचा स्क्रीनशॉट फिरवला की त्यातून लगेच वाद निर्माण होतात.
समजा एका व्यक्तीने आपल्या फेसबुकवर लिहिलं — “आजकाल राजकारणात विचार कमी आणि भक्ती जास्त दिसते.” हे एक सर्वसाधारण निरीक्षण असू शकतं. पण एका पोपटाने लगेच त्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढला आणि एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवला — “पहा, हा आपल्या पक्षाला टोमणे मारतोय.” तिथे काही लोक चिडले. त्यांनी त्या व्यक्तीवर टीका सुरू केली. मग त्या प्रतिक्रियांचे स्क्रीनशॉट पुन्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये गेले. काही वेळातच एक छोटा विचारांचा मुद्दा मोठ्या डिजिटल युद्धात बदलला.
या संपूर्ण प्रक्रियेत मूळ पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त आनंद कुणाला होत असेल, तर तो स्क्रीनशॉट पुढे पाठवणाऱ्या पोपटाला! कारण त्याला वाटत असतं की आपणच या संपूर्ण नाट्याचा सूत्रधार आहोत. दोन लोकांमध्ये थेट भांडण नसलं, तर ते निर्माण करण्याची क्षमता या लोकांमध्ये असते. एखाद्या पोस्टचा संदर्भ बदलून, अर्धवट स्क्रीनशॉट फिरवून किंवा मुद्दाम काही ओळी कापून ते भांडणाला खतपाणी घालतात.
एकदा एका प्रायव्हेट फेसबुक ग्रुपमध्ये एका व्यक्तीने लिहिलं — “धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणणारे लोक अनेकदा इतरांच्या भावना दुखावण्याचा अधिकार स्वतःला देतात.” हा विचार त्या ग्रुपच्या चर्चेपुरता मर्यादित होता. पण ग्रुपमधल्या एका पोपटाने लगेच स्क्रीनशॉट काढला आणि बाहेर पाठवला. काही मिनिटांत त्या व्यक्तीला “धर्मद्रोही” घोषित करण्यात आलं. त्याच्या इनबॉक्समध्ये शिव्या सुरू झाल्या. त्याच्या जुन्या पोस्ट्स शोधून त्याला ट्रोल करण्यात आलं. गंमत म्हणजे त्या पोस्टचा पूर्ण संदर्भ कुणी वाचलाच नव्हता. पण स्क्रीनशॉट फिरला आणि युद्ध पेटलं.
सोशल मीडियावर आजकाल अनेक लोक पोस्ट लिहिण्यापेक्षा “ही पोस्ट कुठे जाईल?” याचा जास्त विचार करतात. कारण प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा पोपट असतोच. एखाद्या बंद व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये लोक मोकळेपणाने बोलतात, पण त्याच ग्रुपमधला एखादा पोपट स्क्रीनशॉट बाहेर पाठवतो. मग त्या व्यक्तीबद्दल गैरसमज पसरतात. काही वेळा मैत्री तुटतात. काही वेळा नाती खराब होतात. काही वेळा लोक मानसिकदृष्ट्या खचून जातात.
विशेष म्हणजे या पोपट मंडळींना स्वतःला निष्पक्ष समजण्याचा फार मोठा गैरसमज असतो. “मी तर फक्त स्क्रीनशॉट पाठवला”, “मी काही बोललो नाही”, “मी तर माहिती दिली”, असं ते सहजपणे म्हणतात. पण प्रत्यक्षात सोशल मीडियावर अनेक भांडणांची सुरुवात ही याच “फक्त स्क्रीनशॉट” पासून झालेली असते. कारण कोणतीही गोष्ट तिच्या मूळ संदर्भातून बाहेर काढली की तिचा अर्थ बदलतो.
उदाहरणार्थ, एखाद्या लेखकाने विनोदी शैलीत लिहिलं — “आपल्या देशात प्रत्येकाला क्रिकेट, अर्थशास्त्र आणि परराष्ट्रनीती यांचं तज्ज्ञ ज्ञान असतं.” हे एक उपरोधिक विधान आहे. पण एका पोपटाने त्याचा अर्धवट स्क्रीनशॉट काढला आणि लिहिलं — “हा देशाची खिल्ली उडवतोय.” काही मिनिटांत त्या लेखकावर देशविरोधी असल्याचा आरोप सुरू होतो. कुणी पूर्ण पोस्ट वाचत नाही. कुणी संदर्भ समजून घेत नाही. कारण सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणं सोपं असतं, विचार करणं कठीण असतं.
या पोपट मंडळींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सतत महत्त्वाचं वाटून घ्यायचं असतं. त्यांच्या स्वतःच्या पोस्टवर कदाचित कुणी प्रतिक्रिया देत नसेल, पण दुसऱ्याच्या पोस्टचा स्क्रीनशॉट पुढे पाठवून ते स्वतःला “इनसाइडर” समजतात. जणू काही सोशल मीडियाच्या गुप्त राजकारणाचे ते सूत्रधार आहेत, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे ते प्रत्येक गटात सक्रिय असतात. कुठे कोणाचं भांडण सुरू आहे, कोण कुणावर नाराज आहे, कोण कोणाला ब्लॉक केलं आहे, याची त्यांना संपूर्ण माहिती असते.
पूर्वी गावात काही लोक असायचे, ज्यांचं मुख्य काम इकडचं तिकडे सांगणं. एका घरातलं दुसऱ्या घरात, एका गल्लीतलं दुसऱ्या गल्लीत पोहोचवणं. कुठे भांडण लावायचं, कुठे गैरसमज वाढवायचे, कुठे कान भरायचे, हा त्यांचा उद्योग असायचा. सोशल मीडियाने अशा लोकांना नवीन रूप दिलं आहे. आता तेच लोक स्मार्टफोन घेऊन फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर सक्रिय झाले आहेत. फरक एवढाच की पूर्वी ते तोंडी बोलायचे; आता स्क्रीनशॉट पाठवतात.
आज अनेक सुशिक्षित लोक सोशल मीडियापासून दूर जात आहेत. कारण त्यांना या सततच्या स्क्रीनशॉट संस्कृतीचा कंटाळा आलाय. लोक आता प्रायव्हेट ग्रुपमध्येही मोकळेपणाने बोलायला घाबरतात. कारण “हे बाहेर जाईल” ही भीती कायम असते. परिणामी खरी चर्चा मरते. लोक स्वतःला सेन्सॉर करू लागतात. प्रत्येक शब्द मोजून बोलू लागतात.
आणि हो… या सोशल मीडिया पोपट संस्कृतीत आणखी एक गंमत असते. आपण स्वतः लिहिलेली पोस्ट काही दिवसांनी वेगवेगळ्या ग्रुपमधून, वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या संदर्भात परत आपल्याकडेच येते. कुणीतरी कॉपी-पेस्ट केलेली असते, कुणीतरी आपलं नाव काढून स्वतःचं टाकलेलं असतं, तर कुणीतरी मूळ मजकूर अर्धवट बदललेला असतो. मग काही वेळा स्वतःलाच प्रश्न पडतो — “अरे… ही माझीच पोस्ट आहे ना?”
सोशल मीडियावर स्क्रीनशॉट आणि कॉपी-पेस्टचं हे इतकं मोठं चक्र तयार झालं आहे की मूळ लेखकापेक्षा पोस्ट फिरवणारे लोक जास्त दिसू लागतात. विचार कुणाचा आणि नाव कुणाचं, हेच ओळखू न येणं हीसुद्धा आजच्या डिजिटल संस्कृतीची एक विचित्र शोकांतिका आहे.
या पोपट संस्कृतीचा समाजावर गंभीर परिणाम होत आहे. लोकशाहीचा पाया संवादावर उभा असतो. पण संवादासाठी विश्वास आवश्यक असतो. आणि स्क्रीनशॉटचं राजकारण हा विश्वास नष्ट करतं. एखाद्या ग्रुपमध्ये बोललेली गोष्ट दुसरीकडे पोहोचणार, याची भीती असेल तर लोक मोकळेपणाने मत मांडणार नाहीत. मग फक्त टोळक्यांचे आवाज उरतात. विचार हरवतो.
काही लोक म्हणतात, “सोशल मीडियावर काहीही लिहिलं की ते सार्वजनिकच असतं.” हे काही अंशी खरं असलं, तरी त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पोस्ट मुद्दाम वेगळ्या संदर्भात फिरवावी. एखाद्याचं मत पटत नसेल, तर त्यावर प्रतिवाद करता येतो. चर्चा करता येते. पण स्क्रीनशॉट फिरवून टोळकं तयार करणं ही बौद्धिक दिवाळखोरी आहे.
सोशल मीडियावर आजकाल एक वेगळीच टोळी संस्कृती तयार झाली आहे. एका गटातल्या लोकांना दुसऱ्या गटातल्या व्यक्तीचा स्क्रीनशॉट दाखवला की लगेच “आपला” आणि “परका” असं वर्गीकरण सुरू होतं. मग व्यक्तीचं मत महत्त्वाचं राहत नाही; तो कोणत्या गटात आहे, हे महत्त्वाचं ठरतं. या वातावरणात स्वतंत्र विचार करणारा माणूस सर्वात जास्त भरडला जातो.
एकदा एका प्राध्यापकाने आपल्या फेसबुकवर लिहिलं — “विद्यार्थ्यांनी कोणत्याही नेत्याला प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे.” एका पोपटाने लगेच त्या पोस्टचा स्क्रीनशॉट एका राजकीय ग्रुपमध्ये टाकला — “हा आपल्या नेत्याविरोधात विद्यार्थ्यांना भडकवतोय.” काही तासांत त्या प्राध्यापकावर सोशल मीडियावर हल्ले सुरू झाले. त्यांच्या जुन्या पोस्ट्स शोधल्या गेल्या. त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला. मूळ विधानात चुकीचं काहीच नव्हतं, पण स्क्रीनशॉटच्या राजकारणाने त्याला वेगळंच रूप दिलं.
या सगळ्यात सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे या पोपट मंडळींना स्वतःच्या कृतीचं गांभीर्य समजत नाही. त्यांना वाटतं की हे फक्त मनोरंजन आहे. पण अनेकदा एखाद्या व्यक्तीची मानसिक शांती, प्रतिष्ठा आणि नातेसंबंध यावर त्याचा परिणाम होत असतो. सोशल मीडियावरचा ट्रोलिंगचा ताण अनेकांना नैराश्यापर्यंत घेऊन जातो. पण स्क्रीनशॉट फिरवणाऱ्या पोपटांना त्याचं काहीच वाटत नाही.
सोशल मीडियावर टिकून राहायचं असेल, तर काही गोष्टी शिकाव्या लागतात. प्रत्येक ट्रोलला उत्तर द्यायचं नसतं. प्रत्येक स्क्रीनशॉटचं स्पष्टीकरण द्यायचं नसतं. आणि प्रत्येक भांडणात उतरायचं नसतं. कारण या पोपट मंडळींचं खरं अन्न म्हणजे आपली प्रतिक्रिया. आपण अस्वस्थ झालो, चिडलो, भांडायला लागलो की त्यांचा हेतू पूर्ण होतो.
त्यामुळे आज सर्वात जास्त गरज आहे ती डिजिटल प्रगल्भतेची. मतभेदांना शत्रुत्वाचं रूप देऊ नये. एखाद्याचं मत पटत नसेल, तर त्यावर सभ्य भाषेत चर्चा करावी. स्क्रीनशॉट फिरवून टोळकं तयार करणं थांबवलं पाहिजे. कारण सोशल मीडिया हा विचारांचा मंच असायला हवा, चुगलीचा बाजार नाही.
शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे — सोशल मीडिया खराब नाही; पण सोशल मीडियावरची काही मानसिकता अत्यंत विषारी आहे. स्क्रीनशॉट फिरवून, लोकांना भिडवून आणि गैरसमज पसरवून काही क्षणांचं मनोरंजन मिळू शकतं; पण त्यातून समाज अधिक सुसंस्कृत होत नाही. उलट विश्वास कमी होतो, संवाद मरतो आणि माणसं एकमेकांपासून दूर जातात.
मतभेद लोकशाहीचे प्राण आहेत. पण स्क्रीनशॉटचं राजकारण आणि पोपट संस्कृती ही लोकशाहीची घाण आहे. आणि जोपर्यंत फेसबुकवरचे हे पोपट इकडचं तिकडे करत राहतील, तोपर्यंत सोशल मीडियावरची भांडणं, ट्रोलिंग आणि विषारी वातावरण कधीच संपणार नाही. कारण सोशल मीडियावरच्या अनेक युद्धांचं खरं शस्त्र विचार नसतात — ते स्क्रीनशॉट घेऊन फिरणारे हे पोपटच असतात.
Comments
Post a Comment