'किमी के-३' : कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवा 'स्फुटनिक क्षण'?
' किमी के-३' : कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवा 'स्फुटनिक क्षण'? जगात महासत्ता ठरविणारे निकष काळानुसार बदलत गेले. एकेकाळी सैन्यशक्ती हा सर्वोच्च निकष होता. त्यानंतर औद्योगिक क्रांतीने अर्थव्यवस्थेला केंद्रस्थानी आणले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक आणि इंटरनेटने जागतिक नेतृत्वाची व्याख्या बदलली. आता एकविसाव्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्ता हेच महासत्तांचे खरे रणांगण बनले आहे. या रणांगणावर अमेरिकेने आजवर निर्विवाद आघाडी घेतल्याचे चित्र होते. मात्र चीनच्या 'किमी के-३' या नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलने या वर्चस्वालाच पहिल्यांदाच उघड आव्हान दिल्याचा दावा समोर आला आहे. हे दावे प्रत्यक्ष चाचण्यांमध्ये सिद्ध झाले, तर ही केवळ एका मॉडेलची घोषणा ठरणार नाही; ती जागतिक सत्तासंतुलन बदलण्याची सुरुवात ठरू शकते. १९५७ मध्ये सोव्हिएत संघाने 'स्फुटनिक' अवकाशात झेपावला, तेव्हा अमेरिकेला प्रथमच आपल्या तांत्रिक श्रेष्ठत्वाला धक्का बसल्याची जाणीव झाली होती. त्यातूनच पुढे नासा उभी राहिली, संशोधनाला अभूतपूर्व चालना मिळाली आणि अमेरिकेने चंद्रावर मानव पाठवून त्या धक्क्याला उत्तर दिल...