बधिर समाजाची अस्वस्थ कहाणी

 बधिर समाजाची अस्वस्थ कहाणी

 आपण एका विचित्र काळातून जात आहोत. आपल्या आजूबाजूला आवाज वाढत आहेत, दृश्ये अधिक भडक होत आहेत, अन्न अधिक संशयास्पद होत आहे, हवा अधिक विषारी होत आहे, रस्ते अधिक असुरक्षित होत आहेत; पण या सगळ्याच्या तुलनेत माणसांच्या प्रतिक्रिया मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत. जणू बाहेरचा गोंगाट वाढत असताना आतली संवेदना शांत होत चालली आहे. ही केवळ एका शहराची किंवा एका पिढीची समस्या नाही. ही संपूर्ण समाजाच्या बधिर होत चाललेल्या मनाची अस्वस्थ कहाणी आहे.

 डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने, ढोल-ताशांच्या दणदणाटाने, भोंग्यांच्या कर्णकर्कश गजराने आणि रात्री-अपरात्री धावणाऱ्या फटफट्यांच्या आवाजाने आपले कान त्रस्त झाले आहेत. सण-समारंभ, मिरवणुका आणि उत्सव हे समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. उत्सव साजरे झालेच पाहिजेत. पण उत्सवाचा आनंद दुसऱ्याच्या शांततेचा बळी घेऊनच साजरा करायचा का? वृद्धांची झोप, लहान मुलांची शांतता, आजारी व्यक्तींची विश्रांती, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दिवसभर काम करून परतलेल्या माणसाचा थोडासा निवांतपणा यांची किंमत आपल्या उत्साहापेक्षा कमी आहे का?

 आज परिस्थिती अशी आहे की, मोठा आवाज झाला की आपण कान झाकतो; पण आवाज करणाऱ्याला प्रश्न विचारत नाही. कारण आपण बधिर झालो आहोत. आवाज कमी करण्याची मागणी करण्यापेक्षा तो सहन करण्याची सवय आपल्याला सोपी वाटते. नियम मोडला जातो, सार्वजनिक शांततेचा भंग होतो, तरी आपण ‘काय करणार?’ म्हणून गप्प बसतो. हीच बधिरता हळूहळू सामाजिक स्वभाव बनत चालली आहे.

 आपले डोळेही त्याला अपवाद नाहीत. स्टेजवर, रस्त्यांवर, मिरवणुकांमध्ये आणि सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली सादर होणारे अश्लील, अश्लाघ्य आणि बीभत्स नृत्य आपण पाहतो. काही कार्यक्रमांमध्ये कलात्मकतेपेक्षा अंगप्रदर्शन, उत्तेजक हावभाव आणि स्वस्त लोकप्रियतेला अधिक महत्त्व मिळते. तरीही गर्दी जमते, टाळ्या वाजतात, मोबाईल कॅमेरे सुरू होतात आणि दुसऱ्या दिवशी तेच दृश्य सोशल मीडियावर फिरते.

 कला आणि मनोरंजनाच्या नावाखाली काय स्वीकारायचे, याची सीमा समाज ठरवतो. प्रेक्षकांची अभिरुची हीच बाजाराची दिशा ठरवते. त्यामुळे दोष केवळ आयोजकांचा किंवा कलाकारांचा नाही. आपण काय पाहतो, कशाला दाद देतो आणि कशाला नाकारतो, यावरही समाजाचे सांस्कृतिक आरोग्य अवलंबून असते. आज डोळे उघडे आहेत; पण विवेकाची दृष्टी मात्र धूसर होत चालली आहे.

 आपल्या जिभेची कहाणी तर अधिक गंभीर आहे. कृत्रिम रंग, भेसळीचे पदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, बनावट पनीर, भेसळयुक्त दूध आणि आरोग्यास घातक ठरू शकणारी विविध रसायने यांच्यातून आपले अन्नविश्व दूषित होत आहे. आपण खातो काय, त्याची निर्मिती कशी झाली, त्यात काय मिसळले आहे, याची शंका मनात असतानाही आपण ते खात राहतो.

 भेसळ करणाऱ्यापेक्षा भेसळ सहन करणारा समाज अधिक धोकादायक असतो. कारण भेसळ करणारा एक व्यक्ती असतो; पण ती भेसळ सहन करणारी मानसिकता हजारो लोकांमध्ये पसरलेली असते. एखादी भेसळ उघड झाली की दोन दिवस संताप व्यक्त होतो. बातम्या येतात, कारवाईची मागणी होते आणि काही दिवसांनी सगळे पूर्ववत होते. आपला संतापही आता अल्पजीवी झाला आहे. त्यामुळे समस्या कायम राहतात आणि आपण त्यांच्याशी जुळवून घेतो.

 शहराची हवा आपल्याला रोज एक वेगळी जाणीव करून देते. वाहनांचे धूर, कारखान्यांचे उत्सर्जन, बांधकामांची धूळ, कचऱ्याचे ढीग आणि जळणाऱ्या कचऱ्याचा धूर यामुळे शहराचा श्वासच गुदमरतो आहे. उकिरड्यांचा दुर्गंध, साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसर याकडेही आपण आता फारसे लक्ष देत नाही. नाकाला दुर्गंध जाणवतो; आपण नाक दाबतो आणि पुढे निघून जातो. पण त्या दुर्गंधामागे असलेली सार्वजनिक व्यवस्थेची समस्या आपल्याला जाणवते का?

 स्वच्छ हवा, स्वच्छ रस्ते, स्वच्छ परिसर आणि सुरक्षित सार्वजनिक जागा या सुविधा नसून नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत. मात्र या हक्कांसाठी सातत्याने प्रश्न विचारण्याऐवजी आपण परिस्थितीशी जुळवून घेतो. शहर अस्वच्छ आहे? ठीक आहे. रस्ता खराब आहे? हळू चला. हवा प्रदूषित आहे? मास्क वापरा. आवाज जास्त आहे? कान बंद करा. व्यवस्था अपयशी ठरली तरी उपाय म्हणून नागरिकांनी स्वतःभोवती संरक्षणाचे कवच उभे करायचे—ही मानसिकता लोकशाही समाजासाठी धोकादायक आहे.

 शरीराची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. बस ,रिक्शा आणि रेल्वेमधील भीषण गर्दी, रस्त्यांवरील खड्डे, बेशिस्त वाहतूक, फुटपाथवरील अतिक्रमणे, असुरक्षित बांधकामे आणि क्षणाक्षणाला वाढणारे अपघातांचे धोके यांच्यामध्ये सामान्य माणूस रोजचा प्रवास करतो. घरातून बाहेर पडताना ‘आज सुखरूप परत येऊ’ ही अपेक्षा असते; पण शहरातील अनेक धोके त्या अपेक्षेलाच आव्हान देत असतात.

 या सगळ्याला आपण ‘जीवनाचा भाग’ म्हणून स्वीकारले आहे. गर्दी आहे—सहन करा. खड्डे आहेत—चुकवून जा. धूर आहे—श्वास रोखा. कचरा आहे—नाक दाबा. भोंगे आहेत—कान झाका. अपघात झाला—दोन मिनिटे हळहळा. आणि मग पुढे चला.

 याच ‘पुढे चालत राहण्याच्या’ सवयीमध्ये आपल्या समाजाचा सर्वात मोठा धोका दडलेला आहे.

 कारण बधिरपणा म्हणजे केवळ आवाज न ऐकू येणे नव्हे. बधिरपणा म्हणजे आवाज ऐकू येऊनही त्याचा अर्थ न समजणे. अन्याय दिसूनही त्याविरुद्ध उभे न राहणे. दुसऱ्याचे दुःख दिसूनही ते आपले नसल्यासारखे पुढे जाणे. चुकीचे घडताना पाहून ‘माझे काय?’ असे म्हणणे. हळूहळू हीच मानसिकता समाजाच्या रक्तात मिसळत जाते.

 आज एखादा अपघात झाला की मदतीसाठी धावण्यापेक्षा मोबाईल कॅमेरा आधी बाहेर येतो. एखाद्यावर अन्याय झाला की प्रत्यक्ष मदतीपेक्षा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे सोपे वाटते. एखादा सार्वजनिक प्रश्न निर्माण झाला की काही दिवस चर्चा होते; नंतर दुसरी बातमी आली की पहिली विसरली जाते. आपली स्मृतीही आता बाजारातील बातम्यांसारखी क्षणभंगुर झाली आहे.

 लोकशाही केवळ मतदानाने जिवंत राहत नाही. ती नागरिकांच्या जागरूकतेने जिवंत राहते. प्रशासनाला प्रश्न विचारणारा नागरिक, चुकीला विरोध करणारा नागरिक, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणारा नागरिक आणि दुसऱ्याच्या अधिकारांचा आदर करणारा नागरिक हे लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आहेत. पण नागरिकच बधिर झाले, तर व्यवस्थेला जाब विचारणार कोण?

 म्हणूनच आज गरज आहे ती केवळ आवाज कमी करण्याची नाही; तर समाजातील बधिरता कमी करण्याची. आपल्या कानांना आवाज जाणवला पाहिजे, डोळ्यांना विकृती दिसली पाहिजे, नाकाला प्रदूषणाचा वास जाणवला पाहिजे, जिभेला भेसळीची चव ओळखता आली पाहिजे आणि शरीराला असुरक्षितता जाणवली पाहिजे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यामुळे मन अस्वस्थ झाले पाहिजे.

 कारण अस्वस्थता ही वाईट गोष्ट नाही. अन्याय पाहून मन अस्वस्थ होणे म्हणजे संवेदना अजून जिवंत आहेत, याचे लक्षण आहे. चुकीच्या गोष्टीबद्दल प्रश्न पडणे म्हणजे विवेक जिवंत आहे, याचे लक्षण आहे. दुसऱ्याच्या वेदनेने आपल्याला वेदना होणे म्हणजे माणुसकी अजून शिल्लक आहे, याचे लक्षण आहे.

 आपण कितीही आधुनिक झालो, कितीही प्रगत झालो, कितीही उंच इमारती उभ्या केल्या, कितीही वेगाने धावलो तरी संवेदना हरवल्या तर त्या प्रगतीला अर्थ उरत नाही.

 आज आपल्या शहरांना अधिक मोठ्या रस्त्यांपेक्षा अधिक जबाबदार नागरिकांची गरज आहे. अधिक मोठ्या स्पीकर्सपेक्षा अधिक मोठ्या आवाजात चुकीविरुद्ध बोलणाऱ्या विवेकाची गरज आहे. अधिक चमकदार कार्यक्रमांपेक्षा अधिक सुसंस्कृत अभिरुचीची गरज आहे. अधिक उत्पादनांपेक्षा शुद्ध अन्नाची गरज आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अधिक माहितीपेक्षा अधिक संवेदनशील मनांची गरज आहे.

 कारण शेवटी प्रश्न हा नाही की आपले कान किती ऐकतात, डोळे किती पाहतात, नाक किती वास घेते किंवा शरीर किती चालते.

 खरा प्रश्न आहे ..या सगळ्याचा आपल्या मनावर अजून काही परिणाम होतो आहे का?

 जर होतो आहे, तर आशा अजून जिवंत आहे.

 पण जर अन्याय, प्रदूषण, भेसळ, अश्लीलता, असुरक्षितता, गोंगाट आणि माणसांचे दुःख पाहूनही आपल्याला काहीच वाटत नसेल, तर आपण केवळ कानांनी बधिर नाही; आपण संपूर्णपणे संवेदनाहीन झालो आहोत.

 आणि म्हणूनच ही केवळ बधिर समाजाची कहाणी नाही. ही आपल्या प्रत्येकाच्या मनाला विचारणारी अस्वस्थ कहाणी आहे—आपण अजूनही संवेदनशील माणसं आहोत की परिस्थितीशी जुळवून घेतलेली जिवंत .....?


Comments

Popular posts from this blog

कायदेशीर अनाथपणात अडकलेले समाजकार्य : मूल्यांची परंपरा आणि व्यवस्थेची उदासीनता

औषध तुमचे, वेदना तुमच्या — पण कायदा त्यांचा!

चौथा स्तंभ की सत्तेची काठी? : टीव्ही न्यूजची पडझड