विचार पटला नाही? थांबा, आधी दोन ठेवून देऊ!

 विचार पटला नाही? थांबा, आधी दोन ठेवून देऊ!

 आपण फार प्रगत समाज आहोत. इतके प्रगत की विचारांचा प्रतिवाद करण्यासाठी आता विचारांची गरज उरलेली नाही. मुद्दा पटला नाही? तर्क द्यायचा कशाला? थेट दोन ठेवून द्यायच्या. आणि त्यानंतर कॅमेऱ्यासमोर छाती फुगवून सांगायचं—“अजूनही ठेवून देईन.” लोकशाहीच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आपण जणू विवेकाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत, जिथे मतभेद सोडवण्याचं सर्वात सोपं आणि लोकप्रिय माध्यम म्हणजे हात.

 पण खरी चिंता एखाद्या एका घटनेची नाही. खरी चिंता आहे ती  पुनरावृत्तीची.

 काल कुणाला स्टुडिओमध्ये गप्प करण्याचा प्रयत्न झाला. आज कुणावर रस्त्यावर हात उगारला जातो. उद्या पुन्हा कुणाला सभेत, कार्यालयात, महाविद्यालयात किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात लक्ष्य केलं जाईल. चेहरे बदलतील, जागा बदलतील, मुद्दे बदलतील; पण पद्धत तीच राहील. कुणाचा विचार पटला नाही की आधी आवाज चढवायचा, मग गर्दी जमवायची आणि शेवटी हात उगारायचा. एकदा हे सामान्य झालं की हिंसा अपवाद राहत नाही; ती सार्वजनिक वर्तनाचा भाग बनते.

 याहून धोकादायक म्हणजे प्रत्येक घटनेनंतर आपण काही काळ संतापतो आणि मग विसरतो. निषेध होतो, चर्चा होते, सोशल मीडियावर पोस्ट येतात, दोन दिवस वातावरण तापतं आणि तिसऱ्या दिवशी नवी घटना आपलं लक्ष वेधून घेते. मागची घटना विसरली जाते. कोणालाही शिक्षा झाली की नाही, समाजाने काही शिकलं की नाही, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधीच पुढचा तमाशा सुरू झालेला असतो.

 म्हणूनच हा केवळ हिंसेचा प्रश्न नाही; हा  हिंसेच्या पुनरावृत्तीला आपण दिलेल्या सामाजिक मान्यतेचा प्रश्न आहे.

 घटना घडते तेव्हा आसपास अनेक माणसं असतात. काही जण मदतीला धावतात, काही विरोध करतात; पण अनेक जण फक्त बघत राहतात. हातातला मोबाईल बाहेर येतो. कॅमेरा सुरू होतो. प्रसंग थांबवण्याऐवजी तो टिपला जातो. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की आपलं कर्तव्य संपल्यासारखं वाटतं. जणू अन्याय रोखण्यापेक्षा त्याचा पुरावा गोळा करणं हीच आपली सामाजिक जबाबदारी आहे.

 माध्यमांचंही यात वेगळं स्थान आहे. हिंसेचा निषेध करण्याऐवजी अनेकदा हिंसा करणाऱ्याला माईक दिला जातो. त्याच्याकडून कारण विचारलं जातं, त्याची भूमिका जाणून घेतली जाते, त्याचे शब्द पुन्हा पुन्हा दाखवले जातात. बातमी दाखवणं आवश्यक असू शकतं; पण हिंसेला प्रसिद्धी आणि हिंसक व्यक्तीला नायकत्व मिळणार नाही, याची संवेदनशीलता कुठेतरी हरवते. एका घटनेचा कंटेंट तयार करताना आपण नकळत पुढच्या घटनेला प्रोत्साहन तर देत नाही ना, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

 समाजाची प्रतिक्रिया तर त्याहून विचित्र आहे.

 “मारहाण चुकीची आहे, पण त्यांनी असं बोलायला नको होतं.”

 या एका वाक्यात आपली संपूर्ण मानसिकता दडलेली आहे. हिंसेचा निषेध करायचा आणि त्याच वेळी तिच्यासाठी कारण शोधायचं. म्हणजे चुकीचं कृत्य मान्य नाही, पण परिस्थिती तशी होती, व्यक्तीने तसं बोलायला नको होतं, भावना भडकल्या होत्या, समोरच्याने आधी चिथावलं होतं—अशा अनेक कारणांनी आपण हिंसेला नैतिक सवलत देतो.

 मतभेदाला मर्यादा असतात; पण हिंसेला समर्थन देण्याचं कारण नसतं.

 कोणीतरी चुकीचं बोललं असेल तर त्याचा प्रतिवाद करा. त्याला प्रश्न विचारा. त्याच्या भूमिकेची चिकित्सा करा. त्याच्या विचारांचा कठोर निषेध करा. पण व्यक्तीवर हात उगारण्याचा अधिकार कुणालाही मिळत नाही. कारण एकदा आपण हा अधिकार स्वतःला दिला की तो अधिकार उद्या दुसराही स्वतःसाठी वापरेल.

 आणि मग चक्र सुरू राहतं.

 आज तो चुकीचा आहे म्हणून त्याच्यावर हात उगारला जातो. उद्या दुसऱ्याचा विचार चुकीचा वाटतो म्हणून त्याच्यावर हात उगारला जातो. परवा आपला विचार कुणाला चुकीचा वाटतो आणि तोच हात आपल्या दिशेने येतो. प्रत्येक वेळी जमावाला आपलं कृत्य योग्य वाटतं, कारण प्रत्येक वेळी हिंसेला आधीच्या घटनेतून एखादं कारण मिळालेलं असतं.

 हीच पुनरावृत्ती सर्वात धोकादायक आहे.

 काल स्टुडिओमध्ये. आज रस्त्यावर. उद्या कदाचित कुठल्यातरी सभागृहात. त्यानंतर कदाचित आपल्या शेजारी. ठिकाण बदलतं; पण हिंसेची भाषा तीच राहते. आणि आपण प्रत्येक वेळी आश्चर्य व्यक्त करतो—“हे पुन्हा कसं घडलं?”

 पुन्हा घडलं कारण आपण मागच्या वेळी पुरेसं गंभीरपणे थांबवलं नाही.

 पुन्हा घडलं कारण आपण हिंसेचा निषेध केला, पण तिच्यामागची मानसिकता बदलली नाही.

 पुन्हा घडलं कारण आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा केली, पण ती आपल्या आवडत्या मतांसाठीच राखून ठेवली.

 पुन्हा घडलं कारण आपण प्रत्येक घटनेत न्यायापेक्षा आपली बाजू शोधली.

 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा घडलं कारण आपण त्या प्रत्येक घटनेनंतर काही दिवसांनी विसरलो.

 समाजाची खरी परीक्षा एखादी घटना घडल्यावर व्यक्त होणाऱ्या संतापात नसते. खरी परीक्षा पुढची घटना घडू नये यासाठी आपण काय बदलतो यात असते.

 विचार पटला नाही तर विचाराने उत्तर द्या. शब्द चुकीचे वाटले तर शब्दांनी विरोध करा. मताचा तिरस्कार करा; पण माणसावर हात उगारू नका. कारण लोकशाहीची खरी ताकद आपण किती मोठ्याने ओरडतो यात नाही, तर आपल्याला न पटणारा आवाज आपण किती संयमाने ऐकू शकतो यात आहे.

 नाहीतर काल कुणीतरी स्टुडिओमध्ये, आज कुणीतरी रस्त्यावर आणि उद्या पुन्हा कुणीतरी दुसरीकडे पडलेला असेल.

 फक्त चेहरा नवा असेल.

 हात तोच असेल.

 गर्दी तीच असेल.

 कॅमेरे तेच असतील.

 आणि आपण पुन्हा म्हणत असू—

 “मारहाण चुकीची आहे हो.. . पण!”

 त्या ‘पण’ची पुनरावृत्ती थांबली नाही, तर हिंसेची पुनरावृत्ती कधीच थांबणार नाही.


Comments

Popular posts from this blog

कायदेशीर अनाथपणात अडकलेले समाजकार्य : मूल्यांची परंपरा आणि व्यवस्थेची उदासीनता

औषध तुमचे, वेदना तुमच्या — पण कायदा त्यांचा!

चौथा स्तंभ की सत्तेची काठी? : टीव्ही न्यूजची पडझड