शाळा बंद नव्हे, भविष्य उघडूया : ग्रामीण शिक्षणाच्या पुनर्रचनेचा विचार
शाळा बंद नव्हे, भविष्य उघडूया : ग्रामीण शिक्षणाच्या पुनर्रचनेचा विचार नवीन वर्ष म्हणजे नव्या संकल्पांची, नव्या अपेक्षांची सुरुवात. वैयक्तिक आयुष्यात जशी आपण मागे वळून पाहतो, तशीच शासनपातळीवरही सुरू असलेल्या योजना, धोरणे आणि निर्णय यांचा आढावा घेतला जातो. काय पुढे न्यायचे, काय बदलायचे आणि काय थांबवायचे—या साऱ्याचा विचार केला जातो. मात्र या प्रक्रियेत एक बाब वारंवार दुर्लक्षित राहते, ती म्हणजे सुरू असलेल्या चांगल्या गोष्टी थांबू नयेत, याची दक्षता. विशेषतः शिक्षणासारख्या मूलभूत आणि समाजाच्या भविष्यासाठी निर्णायक क्षेत्रात, एखादा निर्णय घाईघाईने घेतला गेला, तर त्याचे दूरगामी आणि कधीही न भरून न येणारे परिणाम होऊ शकतात. सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शाळांबाबत सुरू असलेली चर्चा ही याच दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणे किंवा दोन-तीन शाळांचे एकत्रीकरण करणे, हा विषय केवळ प्रशासकीय सोयीपुरता मर्यादित नाही. तो थेट ग्रामीण मुलांच्या शिक्षणाच्या हक्काशी, त्यांच्या सुरक्षिततेशी, विशेषतः मुलींच्या शिक्षणाशी आणि सामाजिक समतेशी संबंधित आहे. लवकरच जिल्हा परिष...